युतीची घोषणा झाल्यानंतर सुरू झालेला दानवे- खोतकर हा राजकीय चित्रपट सुपरहिट ठरला. चित्रपटातील कथेप्रमाणेच शेवट गोड झाला असला तरी नायक, खलनायक, सहाय्यक अभिनेता, दिग्दर्शक-निर्माता अशा अनेक भूमिकांची चर्चा आता होत आहे.
त्याचबरोबर जालन्यातील युतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना खलनायक ठरवत ’आत्ता घे गोड बातमी’ म्हणत चांगलाच समाचार घेतला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघाचा तिढा तब्बल दोन महिने सुरू होता. राज्यमंत्री पदावरील सेनेच्या एका वजनदार नेत्यानेच प्रदेशाध्यक्षांना आव्हान देणे ही युती साठी धोक्याची घंटा ठरणार होती. जालन्यातील राजकीय गणिते पाहता हा वाद मोठा नव्हताच. जालना जिल्ह्यातील सेना संपविणे हे रावसाहेब दानवे यांचे आजचे काम नाही. त्यासाठी तर एवढा मोठा वाद होऊच शकत नाही. कारण गेल्या वीस वर्षात सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांना भाजपने निवडून निवडून संपविले. त्याची साधी दखलही जिल्ह्याच्या नेत्यांनी घेतली ना राज्य पातळीवरच्या नेत्यांनी. जालना जिल्ह्यातील शिवसैनिक सावत्र आईच्या मुलाप्रमाणेच राहिला. जाफराबाद- भोकरदन, बदनापूर यासह अंबड-घनसावंगी या तालुक्यांतील अनेक शिवसैनिक आजही अत्यंत विमनस्क परिस्थितीत फिरताना दिसून येतील. अशा परिस्थितीत अर्जुन खोतकर यांना आताच शिवसैनिकांचा कळवळा कसा येतो. सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी ते राजकीय कारकीर्द पणाला लावतील, असे म्हणणे दूधखुळेपणाचे ठरेल. मग आता हा वाद कशासाठी होता? असा प्रश्न नक्कीच निर्माण झाला आहे. राजकारणात वादाने मोठा फायदा होतो. हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळेच खोतकर- दानवे हा वाद रंगविण्यात आला. याची स्क्रिप्ट मुंबईहून लिहिली गेली असेही आता बोलले जात आहे. काल या वादावर पडदा पडल्यानंतर कार्यकर्त्यांतील चर्चा बरेच काही सांगून गेल्या. या वादात कोण हरले कोण जिंकले काहीच स्पष्ट होत नाही.
आमदार सत्तार ठरले खलनायक
या 'दो हंसो कि जोडी' मध्ये अब्दुल सत्तार मात्र, नाहक खलनायक ठरले आहेत. भाजप सेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता सत्तारांवर तोंडसुख घेणे सुरु केले आहे. अर्जुनाला गळाला लावण्यासाठी आकाशपाताळ एक करणारे सत्तार कालपासून कुठे गायब आहेत, असा सवाल कार्यकर्ते विचारात आहेत. या वादाला फोडणी देणारे सत्तार यांनी एकप्रकारे दानवेंच्या पारड्यात अधिक मते टाकण्याचा प्रयत्न अनाहूतपणे केला. म्हणून मिलनानंतर युतीच्या कार्यकर्त्यांत पेटलेले स्फुलिंग आता निवडणुकीपर्यंत अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान दानवे खोतकर यांच्यासमोर आहे. आता या सो कोल्ड चित्रपटाचा शेवट जरी गॉड झाला असला तरी अंतिम निकाल २३ मे ला कळेल.